IMPIMP

Maharashtra Budget 2024 | ‘अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग”; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Budget 2024 | अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानांतर साधक बाधक चर्चा होऊन विधिमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यांनतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. शासन निर्णय काढता येतो परंतु ही प्रक्रिया डावलून मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा (Mazi Ladki Bahin Yojana) सरकारने शासन निर्णय काढला. हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

विधानसभेत हक्कभंग झाल्याची माहिती दिल्यांनतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जीआर काढून सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. कारण जर अर्थसंकल्पाला अजून मान्यताच नाही तरीदेखील हा जीआर काढला गेला. एकमेकातील राजकारण आणि कुरघोडी या घाईगडबडीत काढलेला हा शासन निर्णय आहे. मा. अध्यक्ष महोदयांनीही हा निर्णय वाचून दाखवला. त्यांनी देखील कायदेशीर बाबींची शहानिशा करणे गरजेचे होते.

या घोषणेचे श्रेय अर्थमंत्र्यांना घेवू द्यायचे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) ही कुरघोडी केली आहे. महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीमधील एका मंत्र्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले आहे. राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या या सगळयाचे प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न म्हणून ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना आणली आहे.

राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता श्री. वडेट्टीवार म्हणाले, त्यांचा अभ्यास कच्चा आहे. बजेटला मंजूरी मिळाल्याशिवाय जीआर काढता येत नाही हे त्यांना कदाचित माहित नसेल.

Related Posts