IMPIMP

Majhi Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना राबवताना लाचखोरी झाल्यास कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

by sachinsitapure

मुंबई: Majhi Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ १ जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरता एक जुलैपासून तलाठी कार्यालय तसंच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सुरुवातीला नमूद केलेल्या नियमातही आता बदल केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. (Eknath Shinde On Majhi Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करताना महिलांकडून लाच मागण्याचे प्रकार समोर आल्यास संंबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे. त्यामुळे महिला भगिणींनी काळजी करू नये.

ज्यांच्याकडं जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल, मतदार ओळखपत्र असेल, पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड असेल अशा सर्वांचा डेटा आपल्याकडे तयार आहे. त्याचा वापर करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महिलांनी गडबडून किंवा घाबरून जाण्याची गरज नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. डोमिसाइलची सक्ती केली जाणार नाही. त्याऐवजी वरीलपैकी कुठलेही एक ओळखपत्र चालेल,असेही त्यांंनी सांगितले.

‘राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. ही योजना अत्यंत जिव्हाळ्याने सुरू केलेली आहे. त्याशिवाय, मोफत सिलिंडरचीही योजना आहे. एक व्यापक विचार करून ही योजना सुरू केलेली आहे. या योजनांचा लाभ सर्व पात्र महिला भगिनींना मिळावा, त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कुचंबणा होऊ नये. त्यांच्याकडून कसलीही पैशाची मागणी होऊ नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. यात कुठलीही कसूर झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

Related Posts