IMPIMP

जम्मू काश्मीरचे पोलीस नागपुरात ! महिला आरोपी ताब्यात; उलटसुलट चर्चेला उधाण

by bali123
हे देखील वाचा :

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील उरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी महिलेला  जम्मू काश्मीर पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक ( arrest ) केली. जम्मू काश्मीरमध्ये घेऊन जात असताना पोलिसांचे पथक काल (रविवार) नागपूर शहरात पोहाेचले. सुरक्षेच्या कारणावरून जम्मू काश्मीर पोलिसांनी रात्रीचा मुक्काम नागपूरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शहरामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांचे पथक फिरताना दिसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

जम्मू काश्मीरमधील सशस्त्र पोलिसांचे वाहन शहरात रात्री 8 वाजता दाखल झाले. वाहनाच्या मागे जम्मू काश्मीर पोलीस असे लिहिलेले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांच्या वाहनात सशस्त्र पोलीस बसल्याचे पाहून तर्कवितर्क लावले जाऊ लागले. पोलिसांच्या गाडीत दहशतवादी किंवा नक्षलवादी असावा, असादेखील तर्क लावण्यात येऊ लागला. याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांच्या वरिष्ठांकडे विचारणा करण्यात आली. वरिष्ठांकडून या वाहनाबाबत विचारणा होऊ लागल्याने सीताबर्डी पोलीस जम्मू काश्मीर पोलिसांच्या वाहनाजवळ पोहाेचले.

सीताबर्डी पोलिसांनी वाहनात पाहिले असता, एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन महिला कर्मचाऱ्यांसह सहा जण पोलीस वाहनात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेवर उरी पोलीस ठाण्यात 306 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपीला ताब्यात घेण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात गेले होते. तेथून महिलेला ताब्यात घेतल्यानंतर रात्र झाल्याने आणि सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी नागपूर शहरात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मार्गातील पोलीस स्टेशन म्हणून जम्मू काश्मीर पोलिसांच्या पथकाने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले.

जम्मू काश्मीर पोलिसांच्या पथकाची राहण्याची आणि जेवणाची सोय नागपूर पोलिसांच्या वरिष्ठांनी केली. तसेच आणखी मदतीबाबत विचारणा करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला आरोपी खरंच 306 गुन्ह्यातील होती किंवा इतर कोणत्या घातपाताच्या गुन्ह्यातील होती. याचा माहिती समजू शकली नाही.

Related Posts