IMPIMP

Baramati Lok Sabha | बारामती चे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या शरद पवार यांना या वयात दुःख देणं पटत नाही; सर्वसामान्य बारामतीकरांची भावना

by sachinsitapure

बारामती – Baramati Lok Sabha | अजित दादा (Ajit Pawar) राज्यात आणि सुप्रिया ताई (Supriya Sule) चांगली विकासकामे करताहेत, पण साहेबांनी पन्नास वर्षांपूर्वी कामांची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे बारामतीचा आजचा कायापालट दिसून येतो. बारामती चे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या पवार साहेबांना या वयात दुःख देणं योग्य वाटत नाही, पवार कुटुंबात जे काही झालं ते एक दुखस्वप्न वाटतं. ताई संसदेत चांगलं काम करत आहेत आणि दादा राज्यात अशी भावना दबक्या आवाजात खुद्द बारामतीकर व्यक्त करत असून थेट कौल कोणाला यावर बोलणं मात्र टाळत असल्याने बारामती मतदार संघातील निवडणुकीची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

बारामती मतदार संघाचा प्रचाराचा धुराळा आज संध्याकाळी पाच वाजता खाली बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद भावजयी मध्ये थेट लढत होत आहे. अजित पवार यांनी भाजप – शिवसेनेसोबत महायुती मध्ये प्रवेश करताना काका आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अनेक गौप्यस्फोट केल्याने बारामतीतील लढत शरद पवार आणि अजित पवार यांच्या भोवतीच फिरत आहे. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील हेच चित्र दिसत आहे.

बारामती मतदार संघामध्ये अखेरच्या दिवशी देखील प्रचाराचा धुराळा उडाला. दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन करत रॅली आणि सभा झाल्या. सुप्रिया यांच्या प्रचार समारोपाच्या सभेस संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान सभेपूर्वी बारामती शहरात फिरून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला.. नागरिकांना विचारणा केली असता, सुरवातीला तर प्रत्येकाने टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले. परंतु नंतर त्यांना बोलते केल्यावर हळूहळू सावध प्रतिक्रिया येऊ लागल्या.

अजित दादा कामाला वाघ आहेत. सुप्रिया सुळे देखील कार्यतत्पर आहेत. परंतु पन्नास वर्षापासून शरद पवार यांनी बारामतीच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. बारामती चा हा नेता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवतो ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

पवार कुटुंबातील फूट ही त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही, ही तमाम बारामतीकराच्या कुटुंबातील दुही असल्याचे मत युवक व्यक्त करत आहेत. तर ज्येष्ठ नागरिक या वयात पवार साहेबाना वेदना देणं हे आम्हाला मान्य नाही, असा संताप व्यक्त करत आहेत. मात्र कौल कोणाला याबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास कचरत आहेत. आम्हीं आमचा निर्णय मतपेटीतून दाखवून देऊ अशी स्पष्टोक्ती बहुतांश बारामतीकर व्यक्त करत असल्याने उत्कंठा अधिकच वाढली आहे.

Related Posts