IMPIMP

FIR On Aditya Birla Memorial Hospital’s CEO | शासनाच्या आदेशाला केराची टोपली, आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ, जनरल मॅनेजरसह 5 जणांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure

पिंपरी:  – FIR On Aditya Birla Memorial Hospital’s CEO | थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये गोरगरीब रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने रुग्णालयाची निरिक्षण व तपासणी करण्याकरीता आलेल्या पथकाला हॉस्पिटलचे सीईओ, जनरल मॅनेजर यांच्यासह इतरांनी सरकारी कामात अडथळा आणला. तसेच सरकारी काम करीत असतांना धर्मादाय हॉस्पीटलने सहाय्य करणे व कागदपत्र पुरवीणे तसेच शासनाचे आदेशाची पुर्तता करणे क्रमप्राप्त असुन कोणतेही आदेशाचे पालन केले नाही. याप्रकरणी हॉस्पिटलचे सीईओ, जनरल मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राधेश्याम हणमंतराव पडलवार (वय-35 रा. सिद्धीविनायक गार्डनिया, नऱ्हे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार हॉस्पिटलचे सीईओ पामेश गुप्ता, जनरल मॅनेजर सिंग, वैद्यकीय समाज सेवक वैशाली पवार, वैद्यकीय समाज सेवक संचित सुर्यवंशी व एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 186, 187, 188, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात निरीक्षक म्हणून कार्य़रत आहेत. शासनाच्या आदेशानुसार फिर्य़ादी यांनी 30 मे रोजी आदित्य बिर्ला हॉस्पिटल रुग्णालयाची तपासणी केली होती. त्यावेळी निदर्शनास आलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने व तपासणीसाठी आवश्यक बाबी विचारत घेऊन एकूण 19 मुद्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत तपसणी समिती अध्यक्ष युमना जाधव, उपसचिव तथा विशेष कार्य अधिकारी, राज्य स्तरीय विशेष मदत कक्ष प्रतिनीधी यांच्या स्वाक्षरीने हॉस्पिटलला कळवले होते.

त्यानुसार मंगळवारी (दि.25) तपासणी करण्याकरिता तपासणी समिती अध्यक्ष युमना जाधव, उपसचिव तथा विशेष कार्य अधिकारी, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष, मुंबई, शरद घावटे, कक्ष अधिकारी, उप मुख्यमंत्री तथा मंत्री, विधी व न्याय विभाग यांचे कार्यालय, नितीन गोखले, सहायक कक्ष अधिकारी (से.नि.) विधी व न्याय विभाग मंत्रालय,मुंबई,जिल्हा समिती सदस्य सिद्धार्थ गिरमे, रुपेश गायकवाड, अधिक्षक, रुग्णालय विभाग, धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग यांचे कार्यालय वरील सर्व समीती सदस्यासह आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल येथे तपासणीसाठी गेले होते.

त्यावेळी बिर्ला मेमोरियल हॉस्पीटलचे सीईओ गुप्ता, जनरल मॅनेजर सिंग, वैशाली पवार, संचित सुर्यवशी यांनी फिर्यादी व इतर करत असलेल्या सरकारी कामात अटकाव करुन धर्मादाय हॉस्पीटलने सहाय्य करणे व कागदपत्रे पुरविणे आवश्यक असताना कोणतेही सहाय्य केले नाही. तसेच शासनाच्या आदेशाची पुर्तता करणे क्रमप्राप्त असल्याने सांगुन देखील कोणतेही आदेशाचे पालन न करता रुग्णालयातून निघून गेले. त्यांच्यातील एक अनोळखी महीला हिने तपासणी पथकास दमदाटीचे भाषेमध्ये चढ्या आवाजात ‘तुम्ही आमच्या महीला कर्मचारी यांना रात्री 10.00 वा. पर्यत का थांबवीले आहे. कोणत्या आदेशाने रात्री तपासणी करीत आहात’ असे बोलुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पमेश गुप्ता यांचे मत

२५ जून २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला (एबीएमएच) मुंबई मंत्रालयातील उपसचिव/विशेष धर्मादाय निधी योजना तपासणी समितीचे अध्यक्ष यांनी भेट दिली.

या भेटी दरम्यान समितीने हॉस्पिटल मध्ये चालवण्यात येणार्‍या धर्मादाय कार्या विषयी काही समस्यांवर प्रकाश टाकणारे पत्र सादर केले. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह हॉस्‍पिटल प्रशासनाने संध्याकाळी ४ वाजल्यानंतर समितीला सर्व सहकार्य करुन समस्येशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर केली. संपूर्ण सहकार्य देऊन सुध्दा आणि सर्व प्रकारची कागदपत्रे सादर करुन सुध्दा समूहाने आमच्या महिला कर्मचार्‍यांसह आमच्या कर्मचार्‍यांची उलटतपासणी रात्री १० वाजेपर्यंत घेतली.

हे सर्व असूनही एक प्रथम माहिती अहवाल (क्र. ०७५४) दाखल करण्यात आला आहे. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही सरकारी कामात अडथळा आणण्यात काहीच हशील नाही. आम्ही नेहमीच समितीला पारदर्शक पध्दतीने सहकार्य करण्याची भुमिका घेतली आहे. एबीएमएच मध्ये आम्ही नेहमीच मानकांच्या बाबतीत आणि आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी समर्पित आहोत.

आमचा असा विश्वास आहे की तपासणी समिती आम्ही दाखल केलेल्या कागदपत्रांचे पुनरावलोकन करेल आणि हेल्थकेअर मधील अनुपालन आणि सर्वोत्कृष्टते ची दखल घेईल.आंम्हाला खात्री आहे की सखोल पुनरावलोकन करुन ‍अनुपालन आणि आमच्या समुदायाची सचोटिने सेवा करण्याची आमची बांधिलकी दर्शवण्यात सहकार्य समिती करेल.

Related Posts