IMPIMP

जेलच्या गेटमधून गजानन मारणेची मिरवणूक निघालीच कशी ? कारागृह प्रमुखांचे चौकशीचे आदेश

by sikandershaikh
ADG Sunil Ramanand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहाच्या आवारात मिरवणूक निघालीच कशी याचीही चौकशी होणार आहे. राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद (ADG Sunil Ramanand) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर नवी मुंबईतील तळोजा जेलमधून त्याची सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अगदी तळोजा कारागृहाच्या गेटमधून गाडीत उभा राहून सिने स्टाईलनं गजानन मारणे थाटात बाहेर पडला. यावेळी त्याच्या गुंडांनी जेलसमोरूनच वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली.

तब्बल 500 वाहनं यात सहभागी झाली होती. कोरोनाची भीती असतानाही केवळ दहशत पसरवण्यासाठी गुंड गजा मारणेनं तळोजा जेल ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली होती. यानंतर माध्यमांनी या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणावर टीकेची झोड उठवली. यानतंर पोलिसांनी गजा मारणेवर गुन्हा दाखल करत अटकही केली.

आता प्रशासनही जागं झालं आहे. त्यामुळं तळोजा जेल परिसरातील गुंडांच्या शक्तीप्रदर्शनाची चौकशी केली जाणार आहे.
गुंडांच्या गाड्या तळोजा जेलच्या आवारात कशा सोडल्या गेल्या ? तिथं शक्तीप्रदर्शन करूच कसं दिलं ? याचीही चौकशी केली जाणार आहे.
भायखळा कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक यांच्या मार्फत ही चौकशी केली जाणार आहे.
त्यानंतर तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे कारागृह प्रमुख सुनील रामानंद (ADG Sunil Ramanand) यांनी दिली.

गजानन मारणे सह 9 जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातही त्याच्या साथीदारांवर दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा कारागृह ते पुणे हद्दीपर्यंत गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केलं आणि दहशत पसरवली.
त्या सर्व पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल झाले तर गजा मारणे टोळीवर पुन्हा एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते.

Related Posts