IMPIMP

Lok Sabha Election 2024 | तरूणाईने आदर्श घ्यावा असे 102 वर्षांचे आजोबा, लोकसभेसाठी 17 व्या वेळी करणार मतदान, 1952 साली केले पहिले मतदान

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election 2024 | देशात लोकसभेसाठी १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून मतदानाचा हक्क बजावलेले आजोबा यंदाही त्याच हिरीरीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शंभरी पार केलेल्या या आजोबांचे नाव आहे निवृत्ती दारवटकर. ते सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावचे रहिवासी आहेत. खडकवासला मतदारसंघात (Khadakwasla Vidhan Sabha) उद्या मंगळवार दि. ७ रोजी होणाऱ्या मतदानातही ते सहभागी होणार आहेत.

निवृत्ती दारवटकर. वय १०२ वर्षे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावात राहतात. या आजोबांचा आदर्श समस्त तरूणाई घेतला पाहिजे. मतदानाच्या दिवशी पर्यटनाला जाणारे बेजबाबदार नागरिक या आजोबांकडून खूप काही शिकू शकतात. या आजोबांनी देशात लोकसभेसाठी १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. आता ते १७ व्या वेळी उद्या लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. हा त्यांचा एक विक्रमच म्हणता येईल.

दारवटकर यांची इच्छाशक्ती १०२ व्या वर्षात देखील तरुणाईला लाजवेल अशी आहे. १९ मे १९२३ रोजी नांदेड गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी लोकसभेसाठी सलग सोळा निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावला आहे. हे या आजोबांकडून नव्या पिढीने शिकण्यासारखे आहे.

विशेष म्हणजे दारवटकर आजोबांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात देखील सहभाग घेतला होता. १९५२ पासून लोकसभेसाठी करत असलेल्या मतदानाबाबत त्यांना मोठा अभिमान आहे.

आपल्या पहिल्या लोकसभा मतदानाची आठवण सांगताना दारवटकर यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांनी लोकांसाठी निवडून देऊन लोकशाहीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे जिकडे तिकडे उल्हासपूर्ण वातावरण होते.

त्याकाळी पुणे लोकसभा मतदारसंघात नांदेड हा पश्चिम हवेलीचा भाग होता. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नरहरी गाडगीळ हे उमेदवार होते. त्या निवडणुकीत मी काँग्रेससाठी प्रचारात सहभागी झालो होतो. तेव्हापासून आजवरच्या सर्व निवडणुकांत जबाबदारी म्हणून मतदानाचे कर्तव्य पार पाडले आहे, असे दारवटकर यांनी सांगितले.

निवृत्ती दारवटकर यांचे शिक्षण तिसरीपर्यंत झाले आहे. त्यांना मोडी लिपी अवगत असून ते मोडी लिपी वाचू आणि लिहू शकतात. त्यांना लहानपणापासून कुस्तीची आवड होती. कुस्तीत त्यांनी चांगले नाव कमावले होते. त्यांच्या कुटुंबात २ मुले आणि ५ मुली आहेत. फळांचे व्यापारी म्हणून ते मार्केट यार्ड, भाजी मंडई येथे सुपरिचित आहेत.

Related Posts