IMPIMP

Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha) ७ मे रोजी तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मावळ (Maval Lok Sabha), पुणे (Pune Lok Sabha) व शिरुर मतदार संघात (Shirur Lok Sabha) मतदान होत असून त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर किमान आश्वासित तसेच अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी दिली.

मतदार हा लोकशाहीच्या केंद्रस्थानी असून त्याच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामध्ये आश्वासित किमान सुविधा, अन्य सुविधा, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार, महिला मतदार आदींसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्र २ किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेली आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार (पीडब्ल्यूडी), ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.

मतदान केंद्रामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी, शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्ची, बाकडे, टेबल आदी फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशासाठी विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे. दुर्गम भागात वीजजोड नसल्यास त्या ठिकाणी बॅटरीचालित एलईडी, चार्जिंगचे दिवे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शविणारे चिन्हे (साईनेज) लावण्यात येतील.

उन्हाळा लक्षात घेता पिण्‍याच्या पाण्याची व्यवस्था आणि सावली नसल्यास मंडपाची व्यवस्था करण्यात येत आहे. महिला व पुरुषांसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसह स्वतंत्र शौचालये, महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघरची सुविधा आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग मधील अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करण्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले मतदान मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत.

याशिवाय औषधोपचार किट, मतदान केंद्रावर शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांग, हालचाल करण्यास अक्षम (लोकोमोटिव डिसेबल्स) आदींना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेचा मोफत पास देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्यास त्यांना अन्य माध्यमातून घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल.

मतदान केंद्रावर महिलांसाठी एक, पुरुषांसाठी एक आणि ज्येष्ठ व शारीरिक विकलांग मतदारांसाठी एक अशा तीन रांगा राहतील, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Related Posts