IMPIMP

Lok Sabha Election | मतदान वाढीसाठी सहकार विभागाचा विशेष प्रयत्न

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election | जिल्ह्यातील पुणे (Pune Lok Sabha), शिरुर (Shirur Lok Sabha) व मावळ लोकसभेसाठी (Maval Lok Sabha) येत्या १३ मे रोजी मतदान होणार असून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रथमच ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थांमधील मतदान वाढीसाठी लेखापरीक्षकांची मदत घ्यावी. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान चिठ्ठी पोहोचविण्यास मदत करावी, मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तीपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत, सभासदांना मतदार यादीत नाव शोधून देणे, पात्र मतदारांची यादी तयार करुन मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घ्यावी अशा सूचना श्री.राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करणे, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

Related Posts