IMPIMP

Mahavikas Aghadi Seat Sharing | महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत पवारांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले – ‘आमच्या सहकारी पक्षांना…’

by sachinsitapure

पुणे : Mahavikas Aghadi Seat Sharing | लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ” आता आमचं एकच लक्ष आहे. अर्जुनाचे जसे पोपटाच्या डोळ्यावर लक्ष होतं. तसंच आमचं आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray) हे तिन्ही पक्ष मिळून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत (Shivsena UBT). नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत आम्ही आमच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप केलं होतं. परंतु, आगामी निवडणुकीत आम्हाला आमच्या मित्रपक्षांना देखील जागा द्यायच्या आहेत. आमच्याबरोबर कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर लहान पक्ष देखील आहेत.

लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा देता आल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचादेखील मानसन्मान करणार आहोत. आमच्या सहकाऱ्यांच्या हिताची जबाबदारी आम्हीच घ्यायला हवी आणि आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. आमच्या तीन पक्षांमध्ये अद्याप जागावाटपासंदर्भात कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. लवकरच आम्ही बोलणी करून जागांची वाटणी करू. त्यानंतर मिळालेल्या जागांवर त्या त्या पक्षाने आपापले उमेदवार निश्चित करून कामाला लागायचं आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही काही प्रमाणात तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत. याचा अर्थ आमच्याकडे तयारीसाठी तीन महिने आहेत आणि या तीन महिन्यात आम्ही जोरदार मोर्चेबांधणी करू. महाविकास आघाडीच्या जागावाटपात आम्हाला ज्या ज्या जागा मिळतील तिथे पुढील तीन महिन्यांत काम करू. या तीन महिन्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज आहे आणि जनतेची ही गरज भागवणे, त्यासाठी उचित भूमिका पार पाडणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्या दृष्टीने कामाला लागू.”

मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार यावर बोलताना पवार म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत,आमचा सामूहिक चेहरा लोकांसमोर ठेऊन पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Posts