IMPIMP

Sharad Pawar | आराम हराम है, शरद पवार डॉक्टरांचा सल्ला धुडकावत पुन्हा मैदानात, 3 दिवसांचा कार्यक्रम जाहीर

by sachinsitapure

पुणे : Sharad Pawar | एका मोठ्या आजाराला चितपट करून ८५ व्या वर्षीसुद्धा तरूणांना हेवा वाटावे असे काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रचारासाठी धावपळ झाल्याने प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. मात्र, आराम करतील ते शरद पवार कसले. आजचे कार्यक्रम प्रकृती अस्वास्थामुळे शरद पवार यांनी रद्द केले होते. मात्र, आज आराम केल्यानंतर तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर करत पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत.

डॉक्टरांनी शरद पवार यांना आराम करण्याची सूचना दिल्याने ते आज दिवसभर बारामतीत मोदी बागेत (Modibaug Baramati) विश्रांती करण्यासाठी थांबले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) उद्या मतदान असल्याने ते घरुनच सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी आज सकाळी नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजपाविरोधात वातावरण ढवळून काढले. कालपासून तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केल्यानंतर त्यांनी केवळ १ दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार यांनी शरद पवार यांचे तीन कार्यक्रम जाहीर केले आहेत.

शरद पवार ८ मे ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची श्रीगोंदा येथे सभा होणार आहे. तसेच त्यांची याच दिवशी शिरुर येथेही सभा होणार आहे. यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदनगर येथे सभा होणार आहे.

शरद पवार यांची ९ मे ला सातारा येथे होईल. याच दिवशी संध्याकाळी अंबाजोगाई येथे सभा होईल. १० मे रोजी शरद पवार पुण्यात येतील. या दिवशी वडगाव शेरी येथे सभा घेतील. तसेच संध्याकाळी चाकण येथे त्यांची सभा होणार आहे.

हा कार्यक्रम रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केला असून सोबत लिहिले आहे की, ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री. अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब!

अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ १ दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय… हाती विचारांचं हत्यार घेऊन. म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं…मिशा काढण्यासाठी, असे लिहिले आहे.

Related Posts