IMPIMP

Shashi Tharoor In Pune | पुण्यातील कार्यक्रमात डॉ. शशी थरूर यांचा घणाघात, मोदी सरकारमुळे श्रीमंत आनंदात, सर्वसामान्यांची स्थिती खालावली

by sachinsitapure

पुणे : Shashi Tharoor In Pune | आता हिंदुत्व आणि श्रीराम मंदिराच्या नावाने मते मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. मोदी सरकारमुळे (BJP Modi Govt) केवळ श्रीमंतच आनंदात असून, सर्वसामान्यांची परिस्थिती खालावत आहे. त्यामुळेच या सरकारविरोधात वातावरण आहे, अशी टीका काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केली.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात थरूर बोलत होते. यावेळी काँग्रेस सरचिटणीस आशिष दुआ, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, एनएसयूआयचे अक्षय जैन, संग्राम खोपडे उपस्थित होते.

खासदार डॉ. शशी थरूर म्हणाले, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत त्यांनी श्रीराम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत रोजगार न मिळालेले मंदिराने कसे संतुष्ट होतील.

डॉ. थरूर पुढे म्हणाले, २०१४ मध्ये विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या नोटबंदीमुळे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले. जीएसटीचा व्यावसायिकांना फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मते मागितली.

गेल्या दहा वर्षांत विकास झाला नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेटड्ढोल-डिझेलच्या किमती वाढल्या, इंधनावरील कर वाढला, महागाई वाढली, रोजगार निर्माण झाले नाहीत. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे, अशा प्रकारे थरूर यांनी मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

थरूर म्हणाले, महासत्तेच्या स्पर्धेत जाणे अवास्तव आहे. कार्यक्षमतेने विकसित होणे अधिक महत्त्वाचे आहे. चीनमधून आयात ११९ टक्के वाढली आहे. भाजपकडून सुरू असलेला कर दहशतवाद धक्कादायक आहे. श्रीमंत व्यक्ती देश सोडून जात आहेत.

डॉ. थरूर म्हणाले, गेल्या दहा वर्षांत जागतिक पातळीवर भारताचा डंका वाजत असल्याचा मोदी सरकारचा दावा धादांत खोटा आहे. शेजारील देशांशी संबंध बिघडले आहेत. भूक निर्देशांक, माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक अशा निर्देशांकामध्ये भारताचे स्थान घसरले आहे.

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सध्याच्या सरकारने पाठीशी घातले. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री महिला असताना नोकरदार महिलांसाठी फार काही सकारात्मक घडले नाही, अशी टीका थरूर यांनी केली.

Related Posts