IMPIMP

Unauthorised Hoardings In Pune | स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानंतरही धोकादायक निदर्शनास आलेली अधिकृत होर्डींग्जही काढणार

by sachinsitapure

पुणे : Unauthorised Hoardings In Pune | स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानंतरही अधिकृत होर्डींग्ज धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास आयुक्तांच्या अधिकारात ते होर्डींग उतरविण्यात येईल. तसेच अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाई वेगाने सुरू असून पुढील पंधरा दिवसांत सर्व अनधिकृत होर्डींग्ज काढून टाकण्यात येतील, असे महापालिका आयुक्त राजेेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी सांगितले.

घाटकोपर येथील होर्डींग कोसळयाने सोळाजणांचा मृत्यू झाल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली. यानंतरही पुणे शहर आणि जिल्ह्यातही अवकाळी पावसात होर्डींग कोसळल्याच्या घटना घडल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. एरव्ही अनधिकृत होर्डींग्ज बाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही त्याकडे डोळेझाक करणार्‍या प्रशासनातील अधिकारी आता कामाला लागले आहेत. मागील आठवडाभरात महापालिकेने सत्तरहून अधिक अनधिकृत होर्डींग्ज उतरवले आहेत. परंतू या होर्डींगवरील पत्रे हटविल्यानंतर लोखंडी सांगाडे अद्यापही जागेवरच दिसून येत आहे. अनेक ठिकाणी होर्डींग्ज उभारण्यासाठी केलेले फाउंडेशन अत्यंत तकलादू असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनानेही अनधिकृत असो अथवा अधिकृत होर्डींग असो प्रत्येकाची तपासणी सुरू केली आहे. महापालिका परवाना देताना होर्डींग मालकाकडून सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडीटही करुन घेते. परवान्यासाठी स्ट्रक्चरल ऑडीटरचा अहवाल आवश्यक असतो. परंतू अनेक ठिकाणी होर्डींग्ज ज्या इमारतींवर उभारले आहेत, अशा इमारती तीस व त्याहून जुन्या आहेत. होर्डींगच्या स्ट्रक्चरचे ऑडीट केले तरी इमारतीचे ऑडीट केलेले असेलच अशी माहिती आकाशचिन्ह विभागाकडे नसते. किंवा होर्डींगसाठीचा लोखंडी सांगडा त्यासाठी केलेले फाउंडेशन ऑडीटरच्या दृष्टीने योग्य असले तरी साध्या डोळ्यांनीही त्रुटी आढळून येतात. या पार्श्‍वभूमीवर स्ट्रक्चरल ऑडीटनंतरही जी होर्डींग्ज धोकादायक वाटतील ती आयुक्तांच्या अधिकारात उतरविण्यात येतील, असे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

रेल्वेच्या हद्दीतील होर्डींग्जवर कारवाईचा अधिकार महापालिकेला नाही

मंगळवार पेठेतील जुना बाजार (Juna Bazaar Mangalwar Peth) येथील चौकात चार वर्षांपुर्वी रेल्वेच्या हद्दीत असलेले होर्डींग रस्त्यावर कोसळून काहींचा मृत्यू झाला होता. परंतू अल्पावधीतच त्याठिकाणी पुन्हा होर्डींग उभारण्यात आले आहे. यासंदर्भात विचारणा केली असता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले, की रेल्वे ऍक्टनुसार रेल्वेच्या हद्दीमध्ये महापालिकेला बांधकाम अथवा आकाशचिन्ह विभागाची परवानगीची आवश्यक्ता नसते. केवळ जे होर्डींग्ज महापालिकेच्या रस्त्यांच्या दिशेने असतात यासाठी महापालिका जाहिरात शुल्क आकारते. रेल्वेच्या जागेवरील होर्डींगवर कारवाईचा महापालिकेला अधिकार नाही.

महापालिका भवन समोर होर्डींग उभारल्याप्रकरणी चौकशी सुरू

महापालिका भवनच्या प्रवेशद्वारालगत रस्त्यावर पीएमपीएमएलच्यावतीने (PMPML) होर्डींग उभारण्यात आले होते. याला आकाशचिन्ह विभागाने परवानगी दिली होती. तसेच होर्डींग उभारताना अडथळा ठरणार्‍या चिंचेच्या झाडाच्या फांद्या छाटण्याची परवानगी उद्यान विभागाच्यावतीने देण्यात आली होती. विशेष असे की जागा निश्‍चित नसतानाच या परवानग्या देण्यात आल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच हे होर्डींग उतरविण्यात आले. जागा निश्‍चित नसताना होर्डींग उभारणारा ठेकेदार त्यांना परवानग्या देणारे आकाशचिन्ह आणि उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी सुरू असल्याचे राजेंद्र भोसले यांनी नमूद केले.

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट ऑफर लेटर देऊन तरुणीची 6 लाखांची फसवणूक

Related Posts