IMPIMP

Warkari’s Accident On Katraj Kondhwa Road | पंढरपुरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघात, 20 वारकरी जखमी

by sachinsitapure

पुणे : – Warkari’s Accident On Katraj Kondhwa Road | विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यात अपघात झाला आहे. वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच वारकरी जखमी झाले आहेत. तर 20 जणांना दुखापत झाली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी वारकऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी आहेत.

हातात भगव्या पताका,डोक्यावर तुळस, टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली-तुकोबांचा जयघोष करत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी आल्या आहेत. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान, वारकऱ्यांना घेऊन निघालेला पिकअप टेम्पो (एमएच 22 एफ.एफ 0227) उलटल्याची घटना कात्रज-कोंडवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. हा टेम्पो परभणी वरुन पंढरपूरकडे निघाला होता. टेम्पोमधील वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. चालकाचे टेम्पो वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. जखमी झालेल्या पाच वारकऱ्यांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले.

याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे (वय- 72 रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चोपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध आयपीसी 279, 337, 338 सह मोटार वाहन कायदा कलम 119/177, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्य़ादी प्रयागबाई बोखारे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली, तसेच त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Posts