IMPIMP

BJP New Party President | भाजपाच्या केंद्रीय अध्यक्षपदाची धुरा मराठी नेत्याच्या हाती?

by sachinsitapure

मुंबई: BJP New Party President | देशात ‘एनडीए’चे सरकार (NDA Govt) स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. भाजपाचा अध्यक्ष हा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतो हे आपण मागील तीन टर्म पाहिलेले आहे.

पक्षाध्यक्ष मग केंद्रात मंत्री असा जणू भाजपाचा फार्म्युला ठरला आहे. आता जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता पक्षाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा आहेत. त्यामध्ये मराठी चेहरा असलेल्या विनोद तावडेंची (Vinod Tawade) चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात विनोद तावडेंचे वर्चस्व 2014 ते 2019 या काळात कमी-कमी होताना दिसून आले. सत्ता आल्यानंतर गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवली होती.

पण त्यांना शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती दिली गेली. पुढे तावडेंची ही खातीही कमी कमी होत गेली. तावडेंच्या पंख छाटण्याकडे अर्थातच भाजपमधील अंतर्गत सत्तास्पर्धा म्हणून पाहिलं जातं.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचे पक्षांतर्गत जे प्रतिस्पर्धी होते, त्यामध्ये विनोद तावडेही असल्याचं मानलं जात होतं आणि तशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली.

2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यावेळी तावडे यांच्यासह राजकीय वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला. त्यांनतर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांनी मजल-दरमजल करत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात आपलं स्थान पक्कं केलं.

2019 नंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. 2021 मध्ये त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 2022 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ते दिल्लीत स्थलांतरित झाले. ही संधी म्हणजे संकटात संधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

2019 मध्ये डावलल्यानंतर पक्षातलं त्यांचं स्थान आता चांगलंच बळकट झालं आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव होतं, ती जाहीर करण्याची संधी त्यांना मिळाली. आता भाजपच्या केंद्रीय अध्यक्षपदी तावडे विराजमान होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून विनोद तावडेंनी सुरुवात केली आहे. त्यांनतर राज्य तसेच देश पातळीवर त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. आज भाजप पक्षाच्या केंद्रीय अध्यक्षपदासाठी ते दावेदार मानले जात आहेत.

Related Posts