IMPIMP

Eknath Khadse | पक्षप्रवेशाआधीच एकनाथ खडसेंची फटकेबाजी सुरु; म्हणाले – ‘बाहेरून आलेल्यांना संधी मिळते…’

by sachinsitapure

मुंबई: Eknath Khadse | आज विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान आज विधिमंडळाच्या आवारात फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या लिफ्ट मधील भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. पक्षात प्रवेश करण्याआधीच एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खडसे यांनी राष्ट्रवादीशी असलेला घरोबा मोडून पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करून न घेता निवडणूक निकालानंतर प्रवेश होईल, असे दिल्लीतील पक्षनेतृत्वाने त्यांना सांगितले. निकाल लागून जवळपास महिना उलटला तरी त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही.

दरम्यान आज विधिमंडळात विविध पक्षाचे आमदार एकमेकांना भेटल्यावर हितगुज करत होते. लोकसभेचा निकाल आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा सुरु होत्या. यामध्ये एकनाथ खडसे, कांदवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर, पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ त्याठिकाणी उपस्थित होते. या भेटीत अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली.

नव्यांना पक्षात संधी मिळते मात्र आपल्याला थांबा थांबा सांगतात हे अतिशय वाईट आहे, असे म्हणत आपल्या मनातील खदखद खडसेंनी बोलून दाखवली. जुन्या काळचा भाजप आणि मोदी-शाह-नड्डांचा भाजप अशी जाणुनबुजून उदाहरणे देऊन बदललेला भाजप खडसे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहरून आलेल्यांना पायघड्या टाकण्याच्या भाजपच्या धोरणांवर एकनाथ खडसेंनी याअगोदरही टीका केली आहे. त्यामुळे भविष्य काळात पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असा संघर्ष आपणाला पाहायला मिळू शकतो.

Related Posts