IMPIMP

Maharashtra Monsoon Session | लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये नेमकी चर्चा काय? दरेकरांनी सगळंच सांगितलं

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Monsoon Session | राज्यात पुढील काही महिन्यातच विधानसभा निवडणूका होणार आहेत. आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

एकमेकांना टोकाचा विरोध करणाऱ्या दोन नेत्यांचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. ठाकरे आणि फडणवीस एकाच वेळी विधानभवनात आले. त्यावेळी त्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. याबाबतची माहिती प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे.

दरेकर म्हणाले, ” राजकारणात आपण राजकीय शत्रू असतो, कायमस्वरुपी शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसही सोबत आले. त्यावेळी कुणीतरी म्हणालं की तुम्ही दोघ एकत्रित आहात बरं वाटतं, त्यावेळी उद्धवजी मला म्हणाले की, याला पहिलं बाहेर काढा. त्यावेळी मी म्हणालो की, तुमचं अजून समाधान झालं नाही का? माझी बाहेर जायची तयारी आहे. होताय का एकत्र. मी म्हणालो, बोलता तसं करा. त्यानंतर आमच्यात थोडासा हास्यविनोद झाला. आम्ही लिफ्टमधून बाहेर आलो. पण, उद्धवजी विरोधी दिशेला गेले. आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी बसायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

पुढे दरेकर म्हणाले, ” विरोधकांना आता जनता बाय, बाय करेल. त्यांना विजयाचा छोटा फुगा मिळाला आहे. तो पूर्ण फुटणार आहे आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन आम्ही जिंकू, असंही दरेकर म्हणाले. राजकारणात आम्ही कोणाचे कायमचे शत्रू नसतो, भेटलो तर बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती असते. त्यामुळे कधी भेटलो तर याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. राजकारणात व्यक्तिगत वैमनस्य नसते. मी शिवसेनेत नाही याचं त्यांना दुःख सलत असतं, असेही दरेकरांनी सांगितलं.

दरम्यान, एरव्ही एकमेंकांवर टीकेचे बाण सोडणारे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आज एकमेकांशी अगदी हसत-खेळत बोलताना दिसले. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप अनुभवले. राज्यातील राजकारणानं कळस गाठल्याची अनेक वक्तव्यही आपण ऐकली. पण आज बऱ्याच दिवसांनी विधान भवनात हसतं खेळतं वातावरण पाहायला मिळालं.

Related Posts