IMPIMP

पश्चिम बंगालपासून केरळपर्यंतचे विश्लेषण ! 5 राज्यांतील निवडणूक निकालाने बदलू शकतात सत्तेची ‘ही’ 5 समीकरणे

by sikandershaikh
west-bengal-kerala-assam-and-tamilnadu

नवी दिल्ली : आसाम, पश्चिम बंगाल (west bengal), तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांतील निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकीचे निकाल 2 मेला जाहीर केले जाणार आहेत. 5 राज्यांतील निवडणुकीच्या निकालातून देशातील सत्ता समीकरणात 5 मोठे बदल घडवू शकतात. त्याचे हे विश्लेषण…

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला तर…

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने देशातील अनेक राज्यांत निवडणूक लढवत पक्षाला बळकटी दिली. यापूर्वी भाजप तिथं बळकट नव्हता. हरियाणापासून ते आसामपर्यंत असे अनेक उदाहरणे आहेत. जर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला तर तिथं पहिल्यांदाच भगवा फडकवला जाणार आहे. पश्चिम बंगालपासून तमिळनाडूपर्यंत या राज्यांत भाजप कमकुवत दिसत आहे. 2019 मध्ये सर्वसाधारण निवडणुकीत बंगालमध्ये 40 टक्के मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपला मोठी आशा आहे.

केरळमध्ये पराभव झाला तर सत्तेतून ‘लेफ्ट’ होईल डावे

भारताच्या पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळला डाव्यांचा गड मानला जात होता. आज पश्चिम बंगालमध्ये डावे मुख्य लढाईतून बाहेर दिसत आहे. तसेच त्रिपुरामध्ये भाजप सरकारने सत्ता स्थापन केली आहे. अशामध्ये केरळ असे एक राज्य आहे तिथे डाव्यांचे सरकार आहे. पी. विजयन यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणाऱ्या डाव्यांना जर पराभव झाला तर ते कोणत्याही राज्यात सत्तेवर येऊ शकणार नाहीत.

स्थानिक पक्षांची ताकदही होईल सिद्ध

2014 नंतर भाजपला ज्याप्रकारे उभारी मिळाली, त्याचप्रकारे देशात काही स्थानिक पक्षांनाही उभारी मिळाली आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसही आहे. जर पश्चिम बंगालच्या सत्तेत तृणमूल बेदखल झाली तर एक प्रभावी स्थानिक पक्षाचा दर्जाही जाणार आहे. बहुजन समाज पक्ष (BSP) आणि समाजवादी पक्ष (SP) यांसारखे पक्ष कमकुवत झाल्यानंतर जर तृणमूल काँग्रेसही कमकुवत बनला तर राष्ट्रीय राजकारणातील समीकरणात परिणाम होईल. याशिवाय तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने जागा जिंकत पक्षाला बळकटी दिली आहे. त्यामुळे जर विधानसभा निवडणूकही जिंकली तर राष्ट्रीय राजकारणात त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे.

काँग्रेससाठी केरळ, तमिळनाडू आणि आसाम महत्त्वाचा

लोकसभेच्या एकूण 543 जागांमध्ये केरळ, तमिळनाडू आणि आसाम या राज्यांत भागीदारी 13 टक्के आहे.
2019 च्या सर्वसाधारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 52 जागांवर विजय मिळवला होता.
ज्यामध्ये निम्म्या जागा त्यांनी याच राज्यातून जिंकल्या.
त्यामध्ये आता काँग्रेससाठी ही तीन राज्ये महत्वाची मानली जातात.
तमिळनाडूत काँग्रेस DMK सोबत ‘धाकटा भाऊ’ म्हणून भूमिका बजावत आहे.
केरळमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) मुख्य आहे.
आसाममध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच AIUDF सह आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ध्रुवीकरणाच्या मुद्यांवरही स्पष्ट होईल प्रतिमा

पश्चिम बंगाल (west bengal), केरळ आणि आसाम या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज आहे.
त्यामुळे या राज्यांत ध्रुवीकरणाचे राजकारण महत्वाचे मानले जाते.
पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा, सरस्वतीची पूजा आणि मुस्लिम तुष्टीकरण निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो.
त्यामुळेच आता ध्रुवीकरणाच्या मुद्यांवर मतदार काय प्रतिक्रिया देते हे पाहणे गरजेचे आहे.

Related Posts