IMPIMP

Pune News | धर्मादाय रुग्णालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट, रुग्णालयांवर कारवाईची सिद्धार्थ गिरमे यांची मागणी

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune News | पुण्यामध्ये सह्याद्री, रुबी, जहांगीर, के.ई.एम यांसारखे अनेक नामवंत धर्मादाय रुग्णालये आहेत. या धर्मादाय रुग्णालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोरगरीब रुग्णाला पकडायचं आणि त्याला सांगायचं तुमची फाईल मी मोफत करून देतो आणि त्यांच्याकडून गरज नसतांना अनामत रकमेची मागणी करायची. यामध्ये बऱ्याच धर्मादाय रुग्णालयांचेही संगनमत असल्याचे दिसून येते. अशा सर्व रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी धर्मादाय आयुक्तांकडे करणार असल्याचे सिद्धार्थ अनिल गिरमे (Siddharth Girme) यांनी सांगितले.

पिवळ्या रेशन कार्ड वर गहू तांदूळ मिळणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील रुग्ण, मोलमजुरी करून गोरगरीब कुटुंबातील रुग्णाला सर्रास लुटायचा जणू व्यवसायचं काही धर्मादाय रुग्णालयांनी सुरु केला आहे. हा रुग्ण त्याच्या हक्काच्या मोफत उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये पाईक असतो. परंतू त्या गोरगरीब रुग्णाला हि काही रुग्णालये व तेथील एजंट त्या गरीब व्यक्तीची तुटपुंजी कमाई व थोडाफार असलेला जमिनीचा तुकडा विकायला लावल्याशिवाय राहत नाही. धर्मादाय नियमानुसार, सर्वात प्रथम निर्धन रुग्णांचे बाबतीत धर्मादाय रुग्णालयांनी प्रत्येक विभागातील वैद्यकीय तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत द्यायची असा नियम आहे.

निर्धन रुग्णाचे देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली असते अशा सेवा त्या रुग्णालयांतील सर्वात खालच्या वर्गासाठी असलेल्या दराने आकाराव्यात तसेच औषधे, उपयोगात आणलेल्या वस्तू (कंझ्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू (इम्प्लांटस्) याचा आकार हा रुग्णालयांनी खरेदीच्या किंमतीतचं लावाव्यात आणि जर डॉक्टरांनी त्यांच्या मेहनतान्यात सूट दिली असेल, तर असा मेहनताना अंतिम देयकांमध्ये (बील) समाविष्ट करू नये असे तयार करण्यात आलेले देयक हे निर्धन रुग्णांच्या निधी खात्यातून खर्ची घालावे असाही नियम आहे. परंतू असे असूनही बरेचं धर्मादाय रुग्णालये मेहनतानाची मागणी त्या गोरगरीब रुग्णाकडून करतात. धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन रुग्णांना दाखल करून घेताना कोणतीही अनामत रक्कम मागायची नसते तरीही त्यांच्याकडून भरमसाठ अनामत रक्कम (डिपोझिट) ची मागणी केली जाते व न भरल्यास आम्ही तुम्हाला दाखल करून घेणार नाही अशी एकाप्रकारे धमकीचं जणू दिली जाते.

येत्या काळात जिल्हास्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून मी धर्मादाय आयुक्तांकडे अशा सर्व रुग्णालयांची तक्रार करणार असून येत्याकाळात जर हे गैरप्रकार जर थांबले नाही तर राज्याच्या विधी व न्याय खात्याच्या मंत्र्यांकडे याची जिल्हास्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून मी लेखी तक्रार करणार व या अशा गोरगरिबांची लूटमार करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करून ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी करणार, असल्याचे सिद्धार्थ गिरमे यांनी सांगितले.

Pune Crime News | पुणे शहरात अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

Related Posts