IMPIMP

Shrinivas Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी फोडल्याने संपूर्ण कुटूंबच दादांवर नाराज, आता सख्ख्या भावाने फिरवली पाठ, श्रीनिवास पवार म्हणाले… (Video)

by sachinsitapure

बारामती : Shrinivas Pawar On Ajit Pawar | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केली आणि आपला वेगळा गट स्थापन करून भाजपासोबत सत्तेत जाणे पसंत केले. विशेष म्हणजे स्वत: अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले, आक्षेपार्ह टीका केली. परंतु, अजित पवार यांची ही कृती पवार कुटुंबियांनाच पसंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबातील अनेक सदस्य शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आता तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीच त्यांची साथ सोडली आहे.

कुटुंबं आपली साथ सोडणार, ही कुणकुण अजित पवारांना आधीच लागली असल्याने त्यांनी बारामतीकरांना काही दिवसांपूर्वी भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबात मला एकटं पाडलं जातंय, असे ते म्हणाले होते. मात्र, अजित पवारांची ही चाल यशस्वी झाली नाही. आता तर त्यांच्या बंधुंनीच संपूर्ण कुटुंबं नाराज का आहे, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा नणंद भावजयीचा संघर्ष रंगणार आहे. पवार कुटुंबातच हा सामना रंगणार आहे. मात्र, अजित पवारांना प्रत्येक प्रसंगी साथ देणारे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवारांची साथ आता सोडली आहे. महत्वाचे म्हणजे श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत.

त्यांचे आमच्यावर उपकार

श्रीनिवास पवार म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितले की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे.

…हे मला पटले नाही

श्रीनिवास पवार म्हणाले, जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढते का? यांना जी काही पदे मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचे घरी बसा, किर्तन करा हे मला पटले नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचे नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचे नाही.

… तेव्हा मला आश्चर्य वाटले.

श्रीनिवास पवार म्हणाले, साहेबांनी काय केले हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटले. ज्यांनी आपल्याला चारवेळा उपमुख्यमंत्री केले. २५ वर्षे मंत्री केले अशा काकांना आपण हे विचारतोय? मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो.

ही सगळी भाजपाची (BJP) चाल

श्रीनिवास पवार म्हणाले, ही सगळी भाजपाची चाल आहे. भाजपाला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे होते. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नितीने भाजपा वागली आहे. शरद पवारांना एकुलती एक मुलगी आहे, साहेब आज दहा वर्षे जुने असते तर त्यांना काय केले असते सगळ्यांना माहीत आहे. वय वाढले म्हणून त्यांना कमकुवत समजू नका.

श्रीनिवास पवार म्हणाले, वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवले होते आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसे आहोत, आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो.

कोण आहेत श्रीनिवास पवार…

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू असून ते उद्योजक आहेत. कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. अजित पवारांच्या प्रत्येक मोठ्या राजकीय निर्णयात श्रीनिवास पवार नेहमी सोबत राहिले आहेत. अगदी पहाटेच्या शपथविधीच्या प्रसंगी देखील अजित पवार हे त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जाते. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नसले तरी कुटुंबातील एक मार्गदर्शक आहेत.

Pune Parvati Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक

Related Posts