IMPIMP

Jalgaon Crime | वाळू माफियांचा उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला ! उपजिल्हाधिकारी गंभीर जखमी, शासकीय वाहन, मोबाईल फोडला

by sachinsitapure
Attack Deputy Collector

जळगाव : Jalgaon Crime | अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपजिल्हाधिकार्‍यांवर वाळू माफियांनी हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार (वय ५७) यांच्यावर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार केले असून त्यांची शासकीय वाहनाची तोडफोड केली. तसेच त्यांचा मोबाईलही फोडून टाकला आहे. कासार यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jalgaon Crime)

ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस ताफा दाखल झाला असून हल्लेखोर वाळू माफियांचा शोध सुरु आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक व तस्करी होत असल्याचा घटना वारंवार समोर येत आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे व अन्य दोन कर्मचारी अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर त्यांनी पकडले. त्यातील एक डंपर न थांबता पळून गेला. तेव्हा कासार यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला परत आणण्यात आले. त्यावेळी कासार हे शासकीय वाहनात बसले होते. तेव्हा सात ते आठ जण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी कासार यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यांच्या डोक्यात रॉडने मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांनी वाहनावर दगडफेक करुन काचा फोडल्या. त्यांच्यावरील हल्ल्याचे कासार चित्रिकरण करु लागल्याचे पाहिल्यावर त्यांनी कासार यांचा मोबाईलही फोडून टाकला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. कासार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनेची माहिती घेऊन तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

Related Posts