IMPIMP

पूजा चव्हाण केस : तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

by bali123
Pooja Chavan

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या राज्यात पूजा चव्हाण प्रकरण ( Pooja Chavan case) मोठ्या प्रमाणात गाजले आहे. या प्रकरणामध्ये नवनवीन वळण येत आहेत. त्यातच आता ‘तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे’ असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या तरुणीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
४ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परळीतील फाउंडेशन शाळेच्या आवारात ही घटना घडली. या घटनेत पूजाची बहीण दिव्यांगा लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगा ही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ४ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते. तेव्हा दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असे सांगितले. यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे दोघे फाउंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना पुन्हा फोन करून दोघांना शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. त्यावेळी दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. यानंतर सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. काही अंतरावर जाताच ती तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली.

अजूनसुद्धा पूजा आत्महत्या प्रकरणाचा तपास चालू आहे. त्यामध्येच आता तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिव्यांगाला बोलावून मोबाईल चोरण्याचा हेतू नेमका काय होता? मोबाईल चोरी करणारी तरुणी कोण होती? त्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत करण्यात येत आहेत. या घटनेनंतर दिव्यांगा आणि सौरभ यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात अनोळख्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ती युवती कोण आणि तिने पूजाच्या बहिणीचा मोबाईल का पळविला ? याचा तपास परळी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related Posts