IMPIMP

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार

नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या शहर सुधारणा समितीची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रावरुन महापालिका प्रशासनाची प्रक्रिया सुरू

by sachinsitapure
PMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | कात्रज डेअरीच्या (Katraj Dairy) मागील बाजूस असलेल्या सुमारे साडेतीन हेक्टर जागेवरील मैदानाचे आरक्षण बदलण्यात येणार आहे. ही जागा दूध डेअरी व प्रक्रियासाठी आरक्षित केली जाणार आहे. या आरक्षणासाठी पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादीतला प्राधीकरण म्हणून नियुक्त करणे, यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याच्या प्रस्तावाला मागील महिन्यांत शहर सुधारणा समितीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) असताना तत्कालीन व विद्यमान महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्रावरुन आरक्षण बदलाची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. हे आरक्षण काढून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३ फेब्रुवारी २०२१ मध्ये पत्र दिले होते. तसेच सदर आरक्षणाकरिता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. (Pune News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या पत्राचा प्रवास राज्य शासन आणि महापालिका असा होउन त्यावरील तांत्रिक प्रक्रिया पुर्ण झाली. विशेष असे की, २१ एप्रिल २०२२ मध्ये महापालिकेने राज्य शासनाकडे पत्र पाठविल्यानंतर शासनाने ५ ऑक्टोबर २०२३ मध्ये याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय महापालिकेला दिला. १५ मार्च २०२२ पासून महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) प्रशासक राज सुरू झाले आहे. महापालिका आयुक्तांनी १९ डिसेंबर २०२३ ला शहर सुधारणा सभेपुढे आरक्षण बदल व दूध संघाला प्राधीकरण नियुक्त करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांच्या हरकती आणि सूचना पाठविण्याचा प्रस्ताव ठेवला. २० डिसेंबरला झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार या आरक्षण बदलावर लवकरच हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी घेउन प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

आरक्षण सुचित नसलेेले आरक्षण संशयास्पद !

दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबधित आहे. शहरी भागाच्या विकास आराखड्याच्या आरक्षण सुचिमध्ये दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगाचा समावेश नाही. असे असताना खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठवून त्या ठिकाणी दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगाचे आरक्षण टाकणे हे नियमबाह्य असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

कात्रज परिसरातील मुलांनी ‘हायवे’वर खेळायचे !

कात्रज गावठाण व डेअरीचा परिसर हा शहराच्या जुन्या हद्दीमध्ये आहे. धनकवडी, बालाजीनगर, कात्रज परिसर मागील काही वर्षांमध्ये झपाटयाने विकसित झाला आहे. या परिसराची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या पुढे आहे. परंतू या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत खेळांची मैदाने नाहीत. यापैकी एक मैदान एका शाळेला भाडेतत्वावर दिले होते. तिथे अन्य नागरिकांना प्रवेशावरून काही वर्षांपुर्वी मोठे वाद झाले होते. अशातच आणखी एका मैदानासाठीची आरक्षित जागा दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगासाठी दिल्यास पुढील पिढ्यांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध राहाणार नाही. कात्रज डेअरीच्या पुर्व दिशेला पुणे सातारा हा शहरातून जाणारा महामार्ग आहे. तर दक्षिणेला बाह्यवळण महामार्ग आहे. भविष्यात मैदानाच्या जागेवर आरक्षण मंजूर झाल्यास मुलांनी ‘हायवे’ वर खेळायचे? असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.

Related Posts