IMPIMP

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी

by sachinsitapure
Sharad Mohol Murder Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Sharad Mohol Murder Case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा (Sharad Mohol Murder Case) तपास हा गुन्ह्याचा रचलेला कट, तयारी आणि प्रत्यक्ष घडलेली घटना अशा तिन्ही दृष्टीकोनातून केला जात आहे. हा गुन्हा करण्याआधी विठ्ठल शेलार (Vitthal Shelar) आणि गणेश मारणे (Ganesh Marne) यांची ज्या ठिकाणी बैठक झाली, त्या बैठकीबाबत चौकशी करण्याबरोबरच अटक केलेल्या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करायचा आहे. गोपनीय अहवालानुसार महत्त्वपूर्ण तपास करणे अद्याप बाकी आहे. यासाठी आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) यांनी न्यायालयात केली. त्यानुसार विशेष मोक्का न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी सात आरोपींना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपास अधिकारी सुनील तांबे यांनी कोर्टात सांगितले की, शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह इतर सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. आरोपींनी काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का? याचा देखील तपास करायचा आहे.

विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. तर आरोपींचे वकील केतन कदम यांनी पोलिसांना तपासाला पूर्ण वेळ दिला आहे. दरवेळी पोलीस नवीन थिअरी समोर आणत आहेत. त्यामुळे कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यावर तपासाच्या अनुषंगाने दरवेळी नवीन माहिती समोर येत असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले. गणेश मारणेला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार या आरोपींना देखील आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली. त्यानुसार सात आरोपींना 9 फेब्रुवारीपर्य़ंत पोलस कोठडी देण्यात आली आहे.

Related Posts