IMPIMP

‘पवार साहेब तुम्ही पावसात भिजलात, आम्ही आज घामानं भिजलोय; आम्हाला न्याय द्या”, MPSC विद्यार्थ्यांची पवारांना भावनिक साद

by bali123
mpsc exam issue students demand take exam 14 march towards ncp chief sharad pawar

सरकारसत्ता ऑनलाइन – आज MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामध्ये पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत. ही परीक्षा सलग ५ वेळा पुढे ढकलण्यात आल्याने अनेक विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षा पुढं ढकलून सरकार आमच्या भविष्याशी खेळतंय, असा संताप विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी या आंदोलनातील एका विद्यार्थ्याने केली आहे.

“शासनानं परीक्षा पुढं ढकलल्या. पण आमच्या आई-वडिलांनी आम्हाला यावेळी अधिकारी होऊन ये याच इच्छेनं पाठवलं होतं. माझी आई रडली होती. तिनं सांगितलं होती की, यावेळी तू अधिकारी झाला पाहिजे. मी माझ्या आईला आश्वासन देऊन आलो होतो की, मी अधिकारी होणार. पवार साहेब तुम्ही पावसात भिजलात हे या महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यानं अन् विद्यार्थ्यानं पाहिलं. आज आम्ही घामानं भिजलोय. आज विद्यार्थी रडतोय. पवार साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला न्याय द्या”, अशी आर्त हाक विद्यार्थ्याने दिली आहे.

MPSC ची परीक्षा सलग ५ वेळा पुढे ढकलल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज ठिकठिकाणी आंदोलने केली होती. परीक्षा १४ मार्च रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरसुद्धा सहभागी झाले होते. तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यात याव्यात आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं तातडीनं मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूनं मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे परीक्षा ठरलेल्या वेळेत घेण्याची मागणी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, मदत व पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे.

Related Posts