IMPIMP

Vijay Shivtare On Ajit Pawar | विजय शिवतारे यांचे अजितदादांवर पुन्हा शरसंधान

by sachinsitapure

पुणे : Vijay Shivtare On Ajit Pawar | शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर शरसंधान केले आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आपण उमेदवार उभा करणार म्हणजे करणार, अशी प्रतिज्ञाच केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी अजित पवार यांना ब्रह्मराक्षसाची उपमा देत टीकास्त्र सोडले आहे. एकंदारीत बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना निवडणूक सोपी नसणार हे स्पष्ट होत आहे.

विजय शिवतारे म्हणाले, ही निवडणूक नमो विचारमंच नावाखाली लढवणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ही लढाई आहे. मी महायुतीच्या विरोधात नसून एकनाथ शिंदेंचा शिलेदार आणि देवेंद्र फडणवीसांना गुरू मानणारा आहे. नरेंद्र मोदींशी निष्ठा असणारा आहे. मी बंडखोरी केलेली नाही. येथे पवार विरुद्ध पवार सामना चालू आहे. विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी जायचे कुठे?

विजय शिवतारे पुढे म्हणाले, २०१९च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरुद्ध केला. हा प्रचार राजकारणाचा भाग आणि माझे कर्तव्य होते. पण अजित पवारांनी असभ्यतेची नीच पातळी गाठली. मी तेव्हा आजारी असल्याने अ‍ॅम्ब्युलन्समधून प्रचार केला. पण अजित पवारांनी तेव्हा म्हटले की मरायला लागला आहे तर कशाला निवडणूक लढवताय?

शिवतारे म्हणाले, माझी गाडी कुणाची, कुठल्या कंपनीची, इत्यादी चौकशी करेपर्यंत त्यांनी खालचा स्तर गाठला. तू कसा निवडून येतो मी बघतो, महाराष्ट्रभरात मी कुणाला पाडायचे ठरवले तर कुणाच्या बापाचे ऐकत नाही, पाडतो म्हणजे पाडतो, असे ते म्हणाले होते.

विजय शिवतारे म्हणाले, गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो. पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती. पण मी त्यांना माफ केले. ते महायुतीत आल्यानंतर त्यांना जाऊन भेटलो. पण तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांच्या उर्मटपणावर बारामती मतदारसंघात लोक म्हणाले की अजित पवार उर्मट आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मत देणार नाही, सुप्रिया सुळेंना मत देणार. दौंडमध्ये लोक असे म्हणत होते.

विजय शिवतारे म्हणाले, यांना पश्चात्तापही नाही. जणूकाही लोकांना फसवणे हा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागतात. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केले जाते. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय. या पापाचे परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावे लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, असे शिवतारे म्हणाले.

Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा

Related Posts