IMPIMP

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

by sachinsitapure
Pune Mundhwa Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Mundhwa Police | नागरिकांकडून पोलिस चौकीत तसेच पोलिस ठाण्यात समक्ष येवुन तक्रार दिल्यानंतर मुंढवा पोलिसांनी नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. मुंढवा पोलिसांनी एकुण 15 रिक्षा चालकांवर कारवाई केली असून त्यामध्ये 6 सिटर रिक्षांचा देखील समावेश आहे. (Pune Crime News)

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत असलेले वाहनांचे प्रमाण आणि त्यातुनच निर्माण होणारी वाहतूक समस्या व नागरिकांमध्ये घडणार्‍या घटना, वाद-विवादाच्या पार्श्वभुमीवर पोलिस चौकीत आणि पोलिस ठाण्यात काही जणांनी रिक्षा चालकांच्या विरूध्द तक्रारी दिल्या होत्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मुंढवा पोलिस आणि वाहतूक शाखेने मुंढवा-केशवनगर परिसरात नो-पार्किंगमध्ये पार्क रिक्षा चालकांवर तसेच गणवेश परिधान न करता रिक्षा वाहतूक करणार्‍या तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकुण 15 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून 21 हजार 200 रूपयाचा दंड वसुल केला आहे.

सर्व रिक्षा चालकांना मुंढवा पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना वाहतूक नियमांचे धडे देवून नियम उल्लंघन न करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी रिक्षा पार्क करण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुकत आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय माळी, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, पोलिस अंमलदार संपत गांजुरे, तानाजी देशमुख, निलेश पालवे, अन्वी साकोरे, मंदाकिनी वारवकर, वाहतूक अंमलदार थोपटे, पठाण, सगर, हेंगले यांनी ही मोहिम राबविली आहे.

Related Posts