IMPIMP

Solapur News : मळणी यंत्रात केस अडकून पतीसमोरच ‘तिचे’ मुंडके धडा वेगळे

by sikandershaikh
death-of-woman

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Solapur News | सध्या सुगीचे दिवस सुरु असून अनेक गांवांमध्ये शेतीच्या कामाला वेग आला आहे. अशातच एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोथरे येथे घडली आहे. मळणी यंत्रावर ज्वारी मळीत असताना एका महिलेचे केस मशिनमध्ये सापडले अन् काही कळायच्या आत क्षणात पतीसमोरच तिचे शीर धडावेगळे झाले. महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी शेतातील वस्तीवर घडली.

उषा पंडित झिंजाडे (वय-42) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंडित झिंजाडे, मुलगा अनिकेत झिंजाडे व पत्नी उषा झिंजाडे हे तिघेजण दुपारी मळणी यंत्रावर ज्वारी मळीत होते. हे काम संपत आले होते. इतक्यात मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी उषा या खाली वाकल्या. भुसकट काढत असताना ज्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जोडले जाते त्या ठिकाणी उषा यांचे केस अडकले. त्यानंतर त्यांचे केस यामध्ये गुरफटून डोकं या यंत्रात अडकले.

हे समजण्याच्या आतच काही क्षणात डोके ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये अडकले अन् डोके शरीरापासून वेगळे झाले. उषा यांना वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला वेळच मिळाला नाही. घटनेची माहिती मिळताच वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Posts