IMPIMP

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती होणार ? गिरीश महाजनांनी दिले ‘हे’ उत्तर

by bali123
girish mahajan

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र, मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगत भाजप नेते गिरीश महाजन ( girish mahajan ) यांनी टाळी देण्यास तूर्तास नकार दिला आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिक महापालिका निवडणूक आणि राज्यातील अनेक राजकीय मुद्यांवर परखड मत व्यक्त केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं मी मास्क वापरणार नाही. त्यांनी मास्क वापरला पाहिजे. पण, तरीही ते मास्क वापरत नाहीत. मात्र, मी मास्क नियमित वापरतो, अशी कोपरखळी त्यांनी राज ठाकरेंना लगावली.

मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला आहे का, असा प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहे. पण आगामी निवडणुकांसाठी मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. नाशिक महापालिकेत भाजपने विकासकामे केली आहेत. त्याच बळावर पुन्हा येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

राज्य सरकारवर निशाणा साधताना महाजन म्हणाले, नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी भरघोस निधी देऊन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असून, विकासकामे निधीअभावी अडवून ठेवली जात आहेत. असे असले तरी केंद्र सरकारकडून निधी आणून भाजपने नाशिक शहराचा सर्वांगीण विकास केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, स्फोटकांची गाडी सापडलेल्या गाडीमालक हिरेनला सुरक्षा द्या ही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मात्र, दुपारी त्यांचा मृतदेह सापडला, जर त्यांना वेळीच सुरक्षा दिली असती तर हा प्रकार घडला नसता. राज्यातील कायदा सुव्यवस्था व परिस्थिती चिंता करण्याच्या पलीकडे आहे. कायदा सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला असल्याची टीका महाजन यांनी केली.

Related Posts