IMPIMP

Lok Sabha Election 2024 | निवडणूक विषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजील’ची सुविधा ! जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election 2024 | स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (ॲप) विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले ‘सी-व्हिजील’ हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण २७८ तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.

लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरुक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे नेहमीच म्हटले जाते. त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियवेर लक्ष ठेवण्याचा असावा असा प्रयत्न भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्यादृष्टीने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप (cVIGIL App) उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

कशी कराल ‘सी- व्हिजील’ वर तक्रार:

मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या ॲपवर साईन इन करुन करता येतात. याशिवाय नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करु शकतात.

आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनीफीती (ऑडिओ) अपलोड करावे. आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडीओ घेऊन अपलोड केली ते ठिकाण जीपीएसद्वारे आपोआप जिओ टॅग होते. तसेच आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशिल भरण्याची सुविधादेखील यात आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरुप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक असून तक्रार दाखल (सबमिट) करावी.

सी-व्हिजील ॲप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थीर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी १५ मिनीटाच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर १०० मिनीटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते.

तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते हेदेखील या ॲपचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास सी-व्हिजीलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Related Posts