IMPIMP

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी; हुसेन दलवाई यांची मागणी

by bali123
hussain dalwai-milind ekbote

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा पुण्यातील कोंढवा भागातील मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नेहमीप्रमाणे दोन्ही समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार, संसद सदस्य हुसेन दलवाई ( hussain dalwai ) यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे. एकबोटे व संभाजी भिडे हे नेहमीच समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात व दंगली घडवून आणतात. सांगली, मिरज व सातार्‍यातील वाई तसेच भीमा कोरेगाव येथे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यावरसुद्धा सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

अल्पसंख्याक समाजातील एखाद्याने केवळ चुकीचे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येते, तसेच त्याच्यावर कारवाईसुद्धा होते. सरकारने शारजील उस्मानी याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, कोणाचीही हयगय केली जाऊ नये. परंतु न्यायाच्या बाबतीत समान दृष्टिकोन असणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यामध्ये घडलेल्या घटनेसंबंधात सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रोज दंगल घडविण्याच्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात; पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काही जणांची अडचण झाली आहे. संभाजी ब्रिगेड, संभाजी सेवा संघ यांसारख्या शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणार्‍या संघटनांमुळे या जातीयवाद्यांचे फारसे काही चालत नाही. या संघटनांचे कौतुक केले पाहिजे, असेसुद्धा दलवाई म्हणाले.

Related Posts