IMPIMP

मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर संशयास्पद कार, 20 जिलेटीनसह धमकीचे पत्र आढळल्याने प्रचंड खळबळ

by amol
mukesh-ambanis-bungalow-sus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (mukesh ambanis) यांच्या बंगल्यासमोर एक संशयास्पद कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबानी यांच्या दक्षिणमुंबईतील मलबार हिल परिसरातील पेडर रोडवरील अँटीलिया या बंगल्यासमोर ही स्कॉर्पिओ कार आढळून आली. ज्यानंतर मुंबई पोलिस तातडीने हरकतीत आले. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

माहितीनुसार, संध्याकाळी ६ वाजल्यापासून ही संशयित स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी (mukesh ambanis) यांच्या घरासमोर उभी होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब प्रतिबंधक पथकाव्यतिरिक्त एटीएसची टीमही तेथे पोहोचली आहे. या कारमध्ये २० जिलेटीन, धमकीचे पत्र आणि ४ गाडीच्या नंबर प्लेट आढळून आल्या असून या स्कॉर्पिओ कारवर असलेली नंबर प्लेट देखील बोगस असल्याचे समजते. महत्वाची बाब म्हणजे गाडीत मिळालेल्या पत्रात अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत मजकूर असल्याचे समजते. ज्यानंतर हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस दहशतवादी कोनातून तपास करत आहे.

दरम्यान, याआधीही मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यात आता आजच्या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. सुरुवातीला हे मॉकड्रिल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, प्रत्यक्ष तपासानंतर घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Posts