IMPIMP

Pune Khadak Police | व्यापार्‍याच्या दुचाकीच्या डिकीतून 11 लाख 50 हजार रूपये चोरणारा सराईत अटकेत ! खडक पोलिसांकडून 500 CCTV कॅमेर्‍यातील फुटेजची तपासणी

by sachinsitapure
Pune Khadak Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Khadak Police | व्यापार्‍यावर पाळत ठेवून तो व्यापारी टिंबर मार्केट येथे गेल्यानंतर त्याच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील 11 लाख 50 हजार रूपये लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज डोळयात तेल घालून पाहिल्यानंतर चोरटयाचा पर्दाफाश झाला असून अखेर त्याला बोपखेल फाटा येथून अटक करण्यात आली आहे. (Pune Khadak Police)

रामकेवल राजुकुमार सरोज उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत (46, सध्या रा. ज्ञानदा सोसायटी, शिक्रापुर रोड, चाकण, पुणे. मुळ रा. पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी रामकेवल याच्याविरूध्द पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात 30 गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश शिवाजी नाळे (35, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) हे टिंबर मार्केट येथे कामानिमित्त गेले होते. आरोपीने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. नाळे हे त्यांची दुचाकी पार्क करून कामासाठी गेले असताना आरोपीने त्यांच्या डिक्कीतील 11 लाख 50 हजार रूपये लंपास केले. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामधून भरदिवसा चोरी झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी तपास पथकातील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना गुन्हयाच्या तात्काळ तपासाबाबत आदेश दिले. पोलिसांनी परिसरातील आणि येण्या-जाण्याच्या रस्त्यावरील तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेज डोळयात तेल घालून तपासले. त्यामध्ये एकजण संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरूवात केली असता तो बोपखेल फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले. खडक पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याने चोरी केलेले पैसे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहाय्यक आयुक्त रूक्मीणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड, पीआय (गुन्हे) संपतराव राऊत, तपास पथकाचे एपीआय राकेश जाधव, पोलिस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, प्रशांत बडदे, रफिक नदाफ आणि आशिष चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts