IMPIMP

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

by amol
Pooja-chavan-bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Chakka Jam Andolan | पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणी एका मंत्र्याकडे संशयाची सुई वळते आहे. या मंत्र्याची हकालपट्टी करून त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी उद्या (दि. 27) भाजपा महिला मोर्चा राज्यभरात चक्का जाम आंदोलन (Chakka Jam Andolan) करणार आहे.

आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकवावा असे आवाहन भाजपा महाराष्ट्रकडून करण्यात आले आहे. 18 दिवसांपुर्वी पुण्यातील वानवडी परिसरात पूजा चव्हाणनं आत्महत्या केली होती. आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर अनेक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. दरम्यान, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपकडून घेण्यात आलं. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळले.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी संजय राठोड यांची अद्याप चौकशी केली नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपच्या चित्रा वाघ यांनी काल (दि. 25) पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपचा स्वरदा बापट यांच्याकडून याप्रकरणी तक्रारी अर्ज देण्यात आला. एवढंच नव्हे तर आज (दि.26) पुण्यातील लष्कर न्यायालयात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी खासगी खटला दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने भाजपा महिला मोर्चा उद्या राज्यभरात चक्का जाम आंदोलन करणार आहे. अहंकारी राज्य सरकारला दणका देण्यासाठी महिलांनी मोठया संख्येने या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं आहे.

Related Posts